औरंगाबाद : काही महिन्यांपूर्वी बीड बायपासवर झालेल्या अपघातात दोन बळी गेल्यानंतर नागरिक आक्रमक झाले होते.या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी मध्यस्थी केल्या नंतर 11 मार्चपासून सातारा देवळाई परिसरातील सर्व्हिस रस्तावर असलेली अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली. प्रारंभी वेगाने सुरू झालेली ही कारवाई नंतर मात्र मंदावली. आता आज बुधवार पासून पुन्हा कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.
मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणार्या बीड बायपास या रस्त्यावर झालेल्या अपघातात आजवर अनेकांनी जीव गमावला आहे. गेल्या 48 तासात झालेल्या अपघातात या रस्त्याने पुन्हा दोन बळी घेतले. बायपास वरील नेहमीच होणारे अपघात आणि त्यात जाणारे बळी यामुळे सातारा देवळाई या परिसरातील रहिवासी अत्यंत संतप्त झाले होते. या नागरिकांनी थेट पोलीस ठाणे गाठत सर्विस रोडला दिरंगाई होत असल्या प्रकरणी जबाबदार असणार्या अधिकार्यांवर कारवाईची मागणी करीत तक्रारही दाखल केली. त्यानंतर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यानंतर पोलिस आयुक्तांनी स्वतः या रस्त्याची पाहणी करत अतिक्रमणधारकांना तंबी दिली होती. त्यानंतर सुस्त बसलेल्या मनपा प्रशासनाने देखील बायपास वरील अतिक्रमण हटवित सर्व्हिस रस्त्याची जागा मोकळी करण्याची मोहीम हाती घेतली. प्रारंभी अतिशय वेगाने ही मोहीम सुरू होती. नंतर मात्र काही न्यायालयीन प्रकरणांमुळे कारवाईची गती मंदावली होती. पुढे पुन्हा लोकसभेच्या निवडणुका दरम्यान बायपास वर कारवाई झाली नाही. आता सुमारे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मनपाने आपला मोर्चा पुन्हा एकदा बायपासवरील अतिक्रमणे हटविण्याकडे वळविला आहे.
आज बुधवारी सकाळीच मनपाचे अतिक्रमण हटाव पथक बायपास वर दाखल झाले. यावेळी एमआयटी ते महानुभव आश्रम या परिसरात शिल्लक राहिलेले अतिक्रमणे काढण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागातील अधिकारी कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. दरम्यान, आज सकाळी प्रारंभ झालेल्या या कारवाईदरम्यान शिल्लक असलेल्या काही मोठ्या मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मोठ्या मालमत्ताधारकांना मुळेच बायपास वरील रस्त्याचे काम थांबले असल्याचे बोलले जाते.








